प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. हा व्हिडीओ 'पद्म पुरस्कार' सोहळ्यातील आहे, जिथे त्यांना नुकताच नवी दिल्ली इथे 'पद्म भूषण' पुरस्कार प्रदान करण्यात आला. व्हिडीओमध्ये अलका याज्ञिक व्हीलचेअरवर बसलेल्या दिसत आहेत. त्यांच्या अशक्त अवस्थेचा व्हिडीओ समोर येताच त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या प्रकृतीची काळजी वाटू लागली आहे. चाहत्यांनी त्यांच्या बरे होण्यासाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली आहे. एका युजरनं लिहिलंय की, "अलका याज्ञिक जी यांना उत्तम आरोग्य आणि बळ मिळो, हीच सदिच्छा. त्या पूर्णपणे बऱ्या होऊन लवकर परत येतील अशी आशा आहे..." दुसऱ्या एका युजरनं कमेंट केलीय आणि म्हटलंय की, "देव त्यांना लवकर बरे करो; आम्हाला त्यांना पुन्हा एखाद्या संगीत कार्यक्रमात पाहायचे आहेत..." चाहत्यांनी त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्याची प्रार्थना करत आहेत आणि त्या पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणेच संगीत विश्वात परततील अशी आशा बाळगत आहेत. 2024 मध्ये, 'सेन्सोरिन्यूरल हिअरिंग लॉस' (SNHL) या दुर्मिळ श्रवणदोषामुळे आपण त्रस्त असल्याचं जाहीर करून अलका यांनी आपल्या चाहत्यांना धक्का दिलाय. या आजारामुळे त्यांच्या ऐकण्याच्या क्षमतेवर गंभीर परिणाम झालाय. सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर करताना अलका याज्ञिक यांनी सांगितलं की, एका व्हायरल संसर्गानंतर अचानक त्यांची ऐकण्याची क्षमता बाधित झालीय. त्यांनी लिहिलंय की, काही दिवसांपूर्वी विमानातून उतरल्यानंतर त्यांना अचानक जाणवलं की, त्यांना काहीच ऐकू येत नाहीये. त्यानंतरच्या वैद्यकीय तपासणीत त्यांना 'सेन्सोरिन्यूरल हिअरिंग लॉस' असल्याचं निदान झालंय. या स्थितीचा त्यांच्या कारकिर्दीवरही परिणाम झालाय, अनेक संगीत दिग्दर्शक आणि संगीतकार त्यांना गाण्यांच्या संधी देत असले तरी, आरोग्याच्या कारणांमुळे त्या अद्याप पूर्णपणे रेकॉर्डिंगसाठी परत येऊ शकलेल्या नाहीत.#social_media #alaka_yajnik #padm_bhushan_award #naram_kalja #sensory_neural_hearing_loss
